उरुळी कांचन, (पुणे) : मुळा-मुठा उजव्या कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या फुरसुंगी येथील 16 वर्षांच्या मुलाचा मृतदेह शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत आढळून आला आहे. उरुळी कांचन पोलीस, मृत मुलाचे नातेवाईक, व स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
प्रेम राहुल डावरे (वय – 16, रा. तुकाई दर्शन, फुरसुंगी, ता. हावेली) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी (ता.18) दुपारी प्रेम हा त्याच्या मित्रासह पोहण्यासाठी गेला होता. प्रेमने इतर मित्रांप्रमाणे पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्यातून वर येता आलं नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. नातेवाईक व मित्रांच्या मदतीने प्रेमचा कालव्यात सर्वत्र शोध सुरु केला. मात्र तो कोठेही आढळून आला नाही.
मंगळवारी (ता. 20) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक पुरुष जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना काही नागरिकांना दिसून आला. याची माहिती उरुळी कांचन पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उमेश जगताप, सुमित वाघ हे सदर ठिकाणी पोहोचले.
दरम्यान, सदर मृतदेह नागरिक, नातेवाईक पोलिसांच्या मदतीने वरती काढण्यात आला. यावेळी सदरचा मृतदेह हा प्रेमचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पंचनामा करून पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विसर्ग सुरू असल्याने पाण्याला वेग
सध्या खडकवासला धरणाच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कालव्यातून वेगाने पाणी वाहत आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्य करण्यात अडथळा निर्माण झाला होता.