लोणी काळभोर (पुणे) : जनतेच्या समस्यांना वाचा फोडावी, विधायक कामे लोकांसमोर आणावीत, सरकारी धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचावीत, राज्यभर घडणाऱ्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक घडामोडींविषयी माहिती व्हावी, या हेतूने ‘जनमानसाचा निडर आवाज…’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘पुणे प्राईम न्यूज’ची सुरुवात झाली. सुरुवातीला साप्ताहिक असणारे हेच ‘पुणे प्राईम न्यूज’ आता दर्जेदार बातम्यांमुळे दैनिकात यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. अवघ्या दोनच वर्षांत ‘पुणे प्राईम न्यूज’ने मोठा टप्पा गाठला आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अद्ययावत बातम्या देणे हा नेहमीच आमचा प्राधान्यक्रम राहिला आहे. त्याचबरोबर समाजकारण, राजकारण, अर्थकारण, कृषी, गुन्हे, शैक्षणिक, आरोग्य, करिअर मार्गदर्शन अशा सर्व क्षेत्रांतल्या बातम्या, लेखांमधून वाचकांच्या पसंतीस उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही केला आहे. जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडींची माहिती तातडीने व विश्वासार्हता पडताळूनच देण्याचा आमचा मानस होता आणि पुढील काळातही असणार आहे. गेल्या दोन वर्षांत तो यशस्वीही झाला.
साप्ताहिकाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर ‘पुणे प्राईम न्यूज’चे पोर्टल सुरु करण्यात आले. याला फक्त स्थानिकच नाही, तर राज्य, देश पातळीवरही चांगला वाचक वर्ग मिळत आहे. वाचकांच्या मतांचा आदर ठेवून हे पोर्टल त्यांच्या अपेक्षेनुसार कार्यरत आहे. वाचकांना काय वाचायला आवडेल आणि त्यांनी काय वाचलं पाहिजे, याचा आम्ही नेहमीच विचार केला आहे. याचीच पोचपावती म्हणजे वर्षभरात आमच्या या पोर्टलला लाखो वाचकांचा उत्तम, उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला आहे. विषयाचे गांभीर्य, विश्वासार्हता टिकवून ठेवत पोर्टलमधील प्रत्येक मजकुरावर लक्ष केंद्रित केल्याने हे पोर्टल वाचकांच्या जिव्हाळ्याचे झाले आहे.
वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे आमचा उत्साह अनेक पटींनी वाढला आहे. यापुढे महाराष्ट्रातील ध्येयवादी, निर्भिड पत्रकारितेची गौरवशाली परंपरा कायम जपत या दैनिकाच्या माध्यमातून ताज्या घडामोडी प्रत्येक सेकंदाला आणि खात्रीशीर तपशीलांसह वाचकांपर्यंत पोहोचविण्याची आमची जबाबदारी अधिकच वाढली आहे. या जबाबदारीचे पालन आम्ही अविरतपणे करत राहू, हा विश्वास या निमित्ताने तुम्हा सर्व वाचकांना, हितचिंतकांना देत आहोत.
पुढील काळात ‘पुणे प्राईम न्यूज’ दैनिकातून जनजीवनाचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला नक्कीच दिसेल. ‘जागल्या’ची भूमिका आम्ही कायमच प्रभावीपणे निभावू. शक्य तितक्या कार्यक्षमतेने ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवताना आमचा तोच उत्साह असेल याची शंभर टक्के खात्री देत आहोत अन् तुमचाही तोच प्रतिसाद आम्हाला कायम लाभेल, एवढीच माफक अपेक्षा ठेवत आहोत. वाचकांशी जुळलेले ऋणानुबंध शेवटपर्यंत जपण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू.
सोशल मीडियावरही ‘पुणे प्राईम न्यूज’ची भरारी!
सध्या बदलत्या काळानुसार आम्ही बदलत आहोत. त्यामुळे सोशल मीडियाच्या प्रत्येक माध्यमातून पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याला तुम्हा वाचकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. फेसबुकवर ५० हजार फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहेच, शिवाय इन्स्टाग्रामवरही हीच साथ कायम आहे. तर यूट्यूबवरही १३ हजार सबस्क्राईबर्स आहेत. तसेच न्यूज पोर्टलला कोट्यवधी वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हे केवळ तुमच्या आणि तुमच्यामुळेच शक्य झालं आहे.
ताज्या, तत्पर बातम्या अन् दर्जेदार लेख, हीच आहे ‘पुणे प्राईम न्यूज’च्या यशाची मेख!
मनापासून धन्यवाद…
जनार्दन दांडगे
(मुख्य संपादक : दैनिक ‘पुणे प्राईम न्यूज’)