धायरी, (पुणे) : पुण्यातील धायरी परिसरातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. खेळताना कॅनॉलच्या पाण्यात गेलेला चेंडू काढण्यासाठी दहा वर्षांचा मुलगा बुडाल्याची घटना घडली आहे. रोहन सुरवसे (वय १०, रा. गल्ली नं. १७, गारमळ, धायरी) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना गल्ली नंबर १७, गारमाळ धायरीलगत असलेल्या कॅनॉलमध्ये सोमवारी (दि. १६) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रोहन, साईराज जेधे आणि आयन नासिर शेख ही तीन मुले कॅनॉलच्या कडेला क्रिकेट खेळत होती. खेळताना त्यांचा चेंडू कॅनॉलच्या पाण्यात गेला. चेंडू काढण्यासाठी दोघे कॅनॉलच्या पाण्यात उतरले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे दोघे वाहून जाऊ लागले. या वेळी कॅनॉलबाहेर असलेल्या मुलाने आरडाओरडा केला. तेथून जात असलेल्या प्रज्वल दीपक जवंजाळ या मुलाने ते पाहिले.
त्याने पाण्यात उडी मारून बुडणाऱ्या एका मुलाला कसेबसे बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत दुसरा मुलगा प्रवाहाच्या मध्यभागी जाऊन बुडाला होता. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक राहुल यादव तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना फोन करून बोलावून नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. नवले अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे, चालक बाळा पांगारे, कैलास आखाडे, बालाजी आखाडे, संकेत गुरव, राजेंद्र भिलारे आणि पीएमआरडीएच्या जवानांनी बराच वेळ कॅनॉलमध्ये दोर टाकून पाण्यात या मुलाला शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र, संध्याकाळपर्यंत मुलगा सापडला नाही.
दरम्यान, मुलगा पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच रोहनच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. रोहनची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याचे वडील प्रकाश हे पोकलेन मशिनवर ऑपरेटर म्हणून काम करतात, तर आई घरकाम करते. त्याला एक लहान भाऊ आहे. एक महिन्यापूर्वीच हे कुटुंब गावावरून पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आले होते.