लोणी काळभोर, (पुणे) : उन्हाचा पारा एवढा चढला आहे, की रखरखत्या उन्हात बाहेर फिरणे अवघड झाले आहे. कडक उन्हाची झळ अंगाला सोसवत नाही. अशात मंगळवारी (ता. ०२) पुन्हा एकदा उन्हाचा चटका पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. दिवसभर तीव्र सूर्य किरणांपासून बचाव करताना पूर्व हवेलीतील नागरिकांची दमछाक झाली आहे.
साधारणतः परिसरातील अधिकतम तापमान उन्हाळ्यात ३५ ते ३८ अंश सेल्सिअस असते. मात्र, यंदा या आठवड्यात लोणी काळभोरसह परिसरातील हेच तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. लोणी काळभोरसह गावोगावी, वाडी – वस्तीवर, शेत शिवारात इतक्या वाढीव तापमानाची सवय नसल्याने लोकांच्या अंगाची लाही – लाही होत आहे. त्यामुळे कामाशिवाय लोक घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणांहून सकाळी अकरा ते दुपारी साडेचार दरम्यान बाहेर पडणे टाळतात.
सकाळी अकरा ते दुपारी साडेचार दरम्यान उन्हाचा चटका इतका असतो की, नागरिक घराबाहेर किंवा कामाच्या ठिकाणाहून बाहेर पडायचे टाळत आहेत. पाणी टंचाईच्या झळाही यंदा वाढीव तापमानाने बसू लागल्या आहेत. तसेच भाजीपाला व पिकेही सुकू लागली आहेत. कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांकडून उपरणे, टोपी, रुमाल आदीच्या माध्यमातून सूर्य किरणांपासून बचाव करीत असल्याचे दिसून येत आहे. उष्ण लाटेच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत पाऱ्यात आणखी वाढ होऊन उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उन्हाच्या तीव्रतेने दुपारी रस्ते ओस पडू लागले असून बाजारपेठेवरही उन्हाचा परिणाम जाणवू लागला आहे.
दरम्यान, तापमानात दररोज हळूहळू वाढ होत असून यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे. त्यामुळे शरिरात उष्णतेचे प्रमाण वाढत असल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्याची खबरदारी घेण्याचे गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. नागरिकांनी उन्हापासून काळजी घेणे गरजेचे आहे. वाढलेल्या उन्हामुळे गॅस्ट्रोसारखी साथ येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राहील, यासाठी लिंबू सरबत, उसाचा रस, फळांचा रस घेणे गरजेचे आहे. उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे. शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राखावी तसेच उन्हापासून शरीराचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
डॉ. समीर ननावरे, श्री गणराज हॉस्पिटल, उरुळी कांचन, (ता. हवेली)