लहू चव्हाण
पाचगणी : कर्करोगाबाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी पुस्तकांचे गाव भिलार येथील हील रेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी जतीन भिलारे यांची दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड झाली. या कार्यक्रमात त्यांनी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून उपस्थिती लावून कर्करोगाविषयी जनजागृती केली.
कर्करोगाबाबत जनजागृती व्हावी आणि या रोगाबाबत रुग्णांनी विशेषतः स्त्रियांनी काळजी घ्यावी, यासाठी दिल्ली येथील कुटुरे रनवे विक या संस्थेच्या वतीने ‘कॅन्सर अवेअरनेस’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून भिलार येथील तेजस्विनी जतीन भिलारे यांनी भाग घेऊन कर्करोगाविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.
याविषयी बोलताना तेजस्विनी भिलारे म्हणाल्या की, “स्त्रियांना सध्या मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्करोगासारख्या आजाराविषयी समाजात विशेषतः स्रियांमध्ये जागृती निर्माण व्हावी, वेळीच उपचार घ्यावेत, यासाठीच मी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ‘कॅन्सर अवेअरनेस ब्रॅंड अॅम्बेसिडर’ हा पुस्तकाच्या गावचा बहुमान आहे.”
याबद्दल तेजस्विनी भिलारे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.