सासवड, (पुणे) : पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपुत यांना निवडणुकीच्या कामकाजातून अलिप्त ठेवण्याचे लेखी आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत. तर त्यांच्या जागी पुणे महानगरचे तहसीलदार सचिन म्हस्के यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुरंदरच्या विधानसभा मतदारसंघाकरिता अधिसूचित असलेल्या तहसीलदार पदावर कार्यरत असलेले विक्रम रजपुत यांना निवडणुकीच्या कामकाजापासून अलिप्त ठेवण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. या दिलेल्या आदेशानुसार, हे सेवावर्ग आदेश आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पारीत करण्यात आले आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सेवा त्यांच्या मूळ पदावर पूर्ववत करण्याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांनी त्यांच्या स्तरावरुन उचित निर्णय घ्यावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या कार्यकाळामध्ये तहसील कार्यालयामधून डेमो ईव्हीएम मशीनची चोरी झाली होती. त्यामुळे तहसीलदार यांना निवडणुकीच्या कामकाजातून हटवण्यात आल्याची चर्चा सध्या पुरंदर तालुक्यामधून सुरू आहे. ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, पुरंदरमधील आणखी काही अधिकार्यांना निवडणुकीच्या कामापासून अलिप्त ठेवण्यात येते की काय, अशा देखील चर्चा पुरंदरमधून सुरु आहेत.