लोणी काळभोर (पुणे) : पुर्व हवेलीमधील मुळा-मुठा नदी किनाऱ्यावर असलेल्या एका सधन गावातील माध्यमिक शाळेत एका माथेफिरु शिक्षकाने आपल्याच शाळेतील एक नव्हे तर तब्बल तीन शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विशेष बाब म्हणजे विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापणाला असतानाही अद्याप संबंधित नराधाम शिक्षकाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई केली सुरु केली नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
दरम्यान वरील शाळेच्या प्रकरणातील नराधाम शिक्षकाने काही वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यातील एका माध्यमिक शाळेतही अशाच प्रकारे एका पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता. त्याही वेळेस शाळा व्यवस्थापनाने त्या घटनेबाबत पोलिसात तक्रार करण्याऐवजी संबंधित नराधाम शिक्षकाला शिक्षा म्हणुन त्याची बदली पुर्व हवेलीमधील वरील शाळेत केली होती. मात्र, शाळेतही या शिक्षकाने तीन मुलींशी अश्लिल कृत्य केले. दोन तालुक्यातील दोन विविध शाळांच्या चारहून अधिक मुलींचा विनयभंग केल्यानंतरही या शिक्षकांच्या विरोधात शिक्षण संस्थेकडुन गुन्हा दाखल होत नसेल, तर लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणात स्वतःहून लक्ष घालावे, अशी मागणी सदर शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी “पुणे प्राईम न्यूज” कडे केली आहे.
मुळा-मुठा नदी किनाऱ्यावर असलेल्या एका सधन गावातील शाळेतील एका शिक्षकाने दिवीळीच्या सुट्टीपुर्वी एका पंधरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची माहिती “पुणे प्राईम न्यूज” च्या हाती लागली होती. या माहितीच्या आधारे “पुणे प्राईम न्यूज”ने बातमी प्रसिध्द करताच पुर्व हवेलीत मोठी खळबळ उडाली होती. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या सदर छप्पन वर्षीय शिक्षकाच्या विरोधात पुर्व हवेलीत अंत्यत संतापाचे वातारवण आहे. त्यातच शुक्रवारी या माथेफिरु शिक्षकाने आपल्याच शाळेतील एक नव्हे तर तब्बल तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची माहिती पुढे आल्याने नागरिक आणि पालकांमध्ये मोठ्या असंतोष पसरल्याचे दिसुन येत आहे. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी “पुणे प्राईम न्यूज” कार्यालयात येऊन संबधित शिक्षकाच्या विरोधात शिक्षण संस्थेने कायदेशीर कारवाई करण्याबाबतची मागणी लावुन धरणार असल्याचे सांगितले.
पहिल्या गुन्ह्याची वेळीच कारवाई झाली असती तर..
पुर्व हवेलीमधील सदर माध्यमिक शाळेत या शिक्षकाने तब्बल तीन शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाला मिळाल्याची कबुली त्यांनी “पुणे प्राईम न्यूज” ला दिली आहे. याबाबत सखोल चौकशी झाल्यास, वरील नराधामाच्या विकृतपणाला आणखी कोणी विद्यार्थिनी बळी आहे? याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र, शाळा व्यवस्थापणाने शाळेचे नाव बदनाम होऊ नये व संबंधित नराधम शिक्षकाच्या वयाचा विचार करुन त्याच्या विरोधात अद्याप कायदेशीर पाऊल उचलले नसल्याचे कारण शाळा व्यवस्थापनाकडुन दिले जात आहे. परंतु, या शिक्षकाच्या पुरंदर तालुक्यातील शाळेत घडलेल्या प्रकरणातच शाळेने कायदेशीर कारवाई केली असती तर पुर्व हवेलीमधील वरील शाळेत वरील प्रकार घडलाच नसता, अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.
नराधाम शिक्षकाबरोबरच व शाळा व्यवस्थापनावरही कायदेशीर कारवाईची गरज..
याबाबत “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोशाध्यक्ष राघवदास चौधरी म्हणाले, एका माथेफिरु शिक्षकाकडुन दोन वर्षाच्या काळात दोन वेगवेगळ्या शाळांमध्ये चारहून अधिक शालेय मुलींचा विनयभंग होतो. तसेच ही घटना दडपली जात आहे, हे गंभीर व चिड आणणारे आहे. या प्रकरणातील माथेफिरु नराधाम शिक्षक व त्याचे कृत्य दडपणारे शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन या सर्वांवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. संबंधित शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवणे अथवा त्याची बदली दुसऱ्या शाळेत करणे ही बाब अतिशय चिड आणणारी आहे. याबाबत आमच्या संघटनेचे कार्यकर्ते पुणे शहर पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन, या नराधाम शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. या प्रकरणात पालक तक्रार देत नसतील, तर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तक्रार देण्याची गरज आहे.