TCS Case : पुणे : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाते. आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला मोठा झटका बसला आहे. अमेरिकेतील डीएक्ससी आयटी कंपनीने टीसीएसवर सोर्स कोड चोरल्याचा आरोप आहे. डीएक्ससी आणि टीसीएस सॉफ्टवेअर स्पर्धक कंपन्या आहेत. 1,800 कोटींचा आर्थिक दंड टीसीएसला सहन करावा लागू शकतो.
1800 कोटींचा दंड
अमेरिकेतील आयटी कंपनी डीएक्ससी पूर्वी सीएससी म्हणून ओळखली जात होती. टीसीएसने आपला सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म TCS Bancs विकसित करण्यासाठी त्याचा सोर्स कोड वापरला असल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात, यूएस ज्युरीने टीसीएसला डीएक्ससी 210 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 1,800 कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे.
डीएक्ससीचा आरोप काय?
डीएक्ससीने 2019 मध्ये या संदर्भात खटला दाखल केला होता. डीएक्ससीने केलेल्या दाव्यानुसार, टीसीएसने बँकिंग प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट विमा प्रकरणासाठी परताव्याचा दर मोजू शकणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात अडचणी येत होत्या. व्हँटेज सॉफ्टवेअर हे काम सहजपणे करत असल्याचे त्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी व्हँटेजचा सोर्स कोड कॉपी करून तो वापरला. डीएक्ससीने खटल्यासोबत संबंधित टीसीएस कर्मचाऱ्यांचे ईमेल तपशील देखील दिले आहेत.
टीसीएसकडून आदेशाला आव्हान
तर, दुसरीकडे टीसीएसचे म्हटले की, कंपनी ज्युरीच्या निर्णयाशी सहमत नाही. टीसीएसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की या प्रकरणावर आता न्यायालय निर्णय घेईल. न्यायालयाने दोन्ही पक्षांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने ते या विषयावर अधिक भाष्य करणार नसल्याचे टीसीएसने म्हटले आहे.
या करारावरून वाद सुरू
भारतीय आयटी कंपनीने ट्रेड सिक्रेट अॅक्सेस केला असल्याचे ज्युरींचे म्हणणे आहे. हे प्रकरण सुमारे पाच वर्षे जुने आहे. 2018 मध्ये टीसीएस आणि ट्रान्सअमेरिका यांच्यात 2.5 बिलियन डॉलर किमतीचा करार झाला. स्थूल आर्थिक परिस्थितीमुळे जून 2023 मध्ये हा करार रद्द करण्यात आला. खटला या कराराशी संबंधित आहे.