पुणे : पुण्यातील प्रसिद्ध एसपी महाविद्यालयाच्य मैदानावर सध्या पुस्तक महोत्सव सुरू आहे. या महोत्सवासाठी आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी (ता. २१) पत्रकार परिषद घेण्यास सुरवात केली, एवढ्यात एक तरुण पत्रकार परिषदेत शिरला आणि मंत्रीमहोदयांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, कार्यक्रमात अनाहूतपणे शिरलेल्या या तरुणामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या परीक्षांची तयारी करणार हा तरुण चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत घुसला. त्याने अचानकपणे विचारलेल्या प्रश्नांमुळे चंद्रकांत पाटील गडबडले. तू पत्रकार आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. त्याने नकार देताच त्याला बाजूला नेण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना केल्या. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारणाऱ्या त्या तरुणाचे नाव कृणाल असे असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक वर्षांपासून वनविभागाच्या परीक्षेची तयारी तो करत आहे. मात्र, अद्याप त्याला नोकरी मिळालेली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या या तरुणाला यासंदर्भात प्रश्न विचारायचा होता. परंतु तो सामान्य व्यक्ती असल्यामुळे त्याला बाजूला करण्यात आले.
दरम्यान, या प्रकारानंतर संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संपूर्ण चौकशी केली असता, त्याला सोडून देण्यात आले.