पिंपरी : “घराशेजारी तमाशाचा फड असल्याने नकळत्या वयापासून तमाशा बघत बघत मी मोठा झालो. ‘रांगडी गंमत तमाशाची’ यासारखी सुमारे चार पुस्तके तमाशा या कलाप्रकारावर लिहून झाली आहेत. तमाशाला बदनाम केले जात असले तरी तमाशा कला म्हणून वाईट नाही”, असे मत लोकसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांनी व्यक्त केले.
ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू, आळंदी रस्ता, मोशी येथे रविवारी (दि.१९) व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात संदीप तापकीर यांनी संमेलनाध्यक्ष सोपान खुडे यांच्याशी दीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधला.
यावेळी सोपान खुडे म्हणाले की, “ज्या गावात अजूनही एकही वर्तमानपत्र येत नाही अशा अतिशय छोट्या गावात माझे बालपण व्यतीत झाले. ग्रामसेवा नाट्य मंडळाच्या माध्यमातून अगदी बालवयातच नाटकाचे संवाद माझ्याकडून लिहून घेतले जात असल्याने लेखनाची बीजे पेरली गेली. नकळत्या वयात ‘टाकीचे घाव’ हे मामासाहेब मोहोळ यांचे चरित्र वाचनात आले अन् मी खूप प्रभावित झालो. त्याच काळात सत्यवान – सावित्री या विषयावर एक नाटक लिहिले. ‘गोधडी’ ही पहिली कविता लिहिली.
पुढे अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचल्यावर माझे लेखन सुमार दर्जाचे असल्याचे लक्षात आले आणि अण्णा भाऊ साठे यांच्यासारखे लेखन करायचा निश्चय मनाशी केला. पुढे शिक्षण झाल्यानंतर पुन्हा लेखनाचा प्रारंभ केला. आजपर्यंत वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील सुमारे तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
“घराशेजारी तमाशाचा फड असल्याने नकळत्या वयापासून तमाशा बघत बघत मी मोठा झालो. ‘रांगडी गंमत तमाशाची’ यासारखी सुमारे चार पुस्तके तमाशा या कलाप्रकारावर लिहून झाली आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करताना ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील विनोद ‘, ‘अण्णा भाऊंची लोकनाट्ये’ अशा वेगळ्या पठडीतील पुस्तकांचे लेखन केले”, असे त्यांनी सांगितले.