लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
खासदार अमोल कोल्हेंची मागणी काय?
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मौजे लोणी काळभोर (ता. हवेली) या गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. याचा त्रास लोकांना होत आहे. लोणी काळभोर येथील जिल्हा परिषद शाळेतील पाण्याची टाकी येथे लोकवस्तीत गावठी दारूची विक्री सर्रास पणे सुरु आहे. त्याच बरोबर या परिसरात अवैध मटका क्लब, बेकायदा हुक्का पार्लर सह सर्व अवैध धंदे सुरु आहेत.
पान विक्रेत्यांच्या टपऱ्यांवर तंबाखू, जर्दा, मावा, गुटखा व नशेचे पदार्थ टाकलेल्या पानांची विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात नशा, गुन्हेगारीकडे वळत आहेत. सदरील बाब अत्यंत संवेदनशील असून पोलीस यंत्रणा याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याची तक्रार लोकांनी केली आहे.
यासंदर्भात तात्काळ कडक पाऊले उचलून या घटनांना वेळीच प्रतिबंध केला नाही तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. तरी आपण जातीने लक्ष घालून लोणी काळभोर येथील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर नियमानुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेस द्यावे, आणि केलेल्या कार्यवाही बाबत मला अवगत करावे, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.