पुणे : मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून 120 मोबाईल व तीन लॅपटॉप असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्वारगेट एसटी स्टँड व पीएमपीएमएल बस स्टँड परिसरात गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे- इम्रान ताज शेख (वय-31 रा. अशरफ नगर, कोंढवा) आणि ऊसामा शफिक शेख (वय- 22 रा. सय्यद नगर, हडपसर, मुळ रा. कुंभार पिंपळगाव, घनसावंगी, जि. जालना), आबिद मुकीम पटेल (वय-23 रा. मालाड मालवणी, मुंबई), अख्तर अली रबियल खान (वय-34 रा.मालाड वेस्ट, मुंबई) अशी आहेत. यामध्ये आणखीन तीन आरोपी निष्पन्न झाले आहेत. आरोपी इम्रानवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये 10 गुन्हे दाखल झालेले आहेत.
स्वारगेट पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी हद्दीत पेट्रोलींग करण्यात येत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, फिरोज शेख व सुजय पवार यांना माहिती मिळाली की, स्वारगेट बस स्थानकात एक संशयित फिरत आहे. त्यानुसार पथकाने इम्रान शेख याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने 100 ते 150 मोबाइल चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले मोबाईल ऊसामा शेख याला विकल्याचेही सांगितले.
आरोपी ऊसामा शेख याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चोकशी केली. खरेदी केलेल्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर मारुन ते मोबाईल पुढे मुंबई येथील एजंट आबिद व अख्तर यांना विकल्याचे सांगितले. पथकाने मुंबई येथे जाऊन एजंट आबिद व अख्तर यांना ताब्यात घेतले. यावेळी आरोपींकडून 12 लाखांचे 120 मोबाईल, एक लाख रुपये किमतीचे तीन लॅपटॉप, सॉफ्टवेअर मारण्याचे तीन डिव्हाईस असा एकूण 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले करीत आहेत.
मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदीनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, फिरोज शेख, सुजय पवार, संदीप घुले, दिपक खेंदाड, अनिस शेख, शिवा गायकवाड, रमेश चव्हाण, प्रविण गोडसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.