संतोष पारधी
वाकी बुद्रुक : स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित श्री शिवनेरी गड ते पुरंदर गड छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री शंभू महाराज या पिता-पुत्रांच्या भेटीचा पाच दिवसांचा पालखी सोहळा स्वराज्य संघाचे अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय थाटामाटात झाला. याबाबतची माहिती स्वराज्य संघाचे संपर्कप्रमुख दिलीप पवळे व सचिव श्यामकांत निघोट यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या पिता-पुत्राची अखेरच्या क्षणी भेट झाली नाही, म्हणून ही अधुरी राहिलेली भेट या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून प्रतिवर्ष घडवून आणली जाते. पालखी सोहळ्याचे हे सहावे वर्ष होते. पुरंदर गडावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पिता-पुत्र भेटीचा सोहळा पुष्पवृष्टी करून व मानवंदना देऊन मंत्रघोषात पूर्ण झाला. यामध्ये अनेक शिवभक्तांचे योगदान लाभले. याचबरोबर प्रशासकीय यंत्रणेनेही सहकार्य केले.
या सोहळ्यामध्ये पालखी मार्गातील नियोजन उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे यांनी केले. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, पुरंदर या परिसरातील अनेक शिवभक्तांनीही सहकार्य केले. या सोहळ्यामध्ये राम पाटील, वनाजी बांगर, संतोष गावडे, नाना जैद, दीपांशू खानदेशी, ओंकार चव्हाण यांच्यासह अनेक शिवभक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.