डोर्लेवाडी, (पुणे) : आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत डोर्लेवाडी (ता.बारामती) येथील स्वामिनी सावता नाळे हिने यश संपादन केले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात ऍग्रिकल्चर असिस्टंट या पदावर कोल्हापूर विभागातून इतर मागास प्रवर्ग मुलींमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
देशातील बारा राष्ट्रीयीकृत बँकांसाठी आयबीपीएस यात तिने यश संपादन केले आहे. यावेळी ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’च्या कृषी अधिकारी स्केल १ या पदी स्वामिनीची निवड झाली आहे. आयबीपीएसमार्फत नुकतीच परीक्षा घेण्यात आली होती. सामाजिक बांधलकी जपणारे स्वामिनी ही शेतकरी व संप्रदाय कुटुंबातील मुलगी व तिचे आई-वडील प्राथमिक शाळेत ज्ञान देणाचे काम करतात.
स्वामिनी ही लहानपणापासूनच हुशार होती. घरातील वातावरण म्हणजे आजोबा कीर्तनकार, आजी व आजोबाही वारी परंपरा जपणारे कुटुंब आहे. स्वामिनीचे शिक्षण डोर्लेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण झाले तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे विद्या प्रतिष्ठान बारामती येथे झाले आहे. तिने पदवी व पदव्युत्तर शिक्षण हे तिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पूर्ण केले.
दरम्यान, या यशासाठी तिने कोणताही क्लास न लावता घरी राहून अभ्यास केला. जिद्द व चिकाटीच्या जोरावर एकाच महिन्यात स्वामिनीने दुहेरी यशाला गवसणी घातली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे भरभरून कौतुक होत आहे.