पुणे: भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या साडे सातशे मीटरचा रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. तो रस्ता क्रॉंक्रीटीचा करण्यात यावा, या मागणीसाठी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर उपोषण करत ठिय्या आंदोलनास बसल्या होत्या. जोपर्यंत संबंधित रस्त्याच्या कामाची तारीख सांगत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे सुळे यांनी सांगितले होते. अखेर त्यांनी 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या लिखित आश्वासनानंतर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
उपोषण मागे घेताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग गेट या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दूरवस्था झाली आहे. हा रस्ता दुरुस्त करावा, या मागणीसाठी गेली अनेक महिने सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु, शासन- प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नव्हती. या शासकीय अनास्थेला कंटाळून मी आज (दि. ९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० वाजल्यापासून उपोषण केले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता प्रशासनाने भेट घेऊन येत्या २ मे २०२५ पासून काम सुरु करण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मी माझे उपोषण मागे घेतले. हे काम विहीत वेळेत पुर्ण करण्याचा शब्द जर प्रशासनाने पाळला नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा देखील यावेळी दिला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला मोठ्या विश्वासाने निवडणून दिले आहे. त्यांच्या हिताची कामे शासनाने केली पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा आम्ही करीत असतो. परंतु, शासन आणि प्रशासनाकडून अडवणूक होत असेल, तर नाईलाजाने संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. आशा आहे की, शासन अथवा प्रशासनाकडून यापुढे जनहिताच्या कामांबाबत अडवणूकीची भूमिका घेतली जाणार नाही, असे देखील सुळे यांनी म्हटले आहे. यावेळी या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार त्यांनी मानले.