पुणे : बारामती लोकसभेची निवडणूक ही नणंद भावयजचा कौटुंबिक कार्यक्रम नाही, सरपंचपदापासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक सिरिअसली घेतली पाहिजे असं वक्तव्य करत खासदार सुप्रिया सुळे आगामी लोकसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे. समोर कोणताही उमेदवार असो, बारामतीच्या प्रश्नावर मी कोणाशीही चर्चा करायला तयार आहे, असंही सुळे म्हणाल्या. मी राजकारणात फसवणूक केली असं हर्षवर्धन पाटील म्हणूच शकणार नाहीत, असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही टोला लगावला. सुप्रिया सुळे या इंदापुरात बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “लोकसभेच्या निवडणुकीकडे नणंद भावजय असं तुम्ही बघता, पण हा कौटुंबिक कार्यक्रम नाही. माझी लढाई ही वैचारिक आहे. माझ्या विरोधात कोणीही उभा राहिलं तरीही त्याच्यासोबत ते म्हणतील ती जागा आणि म्हणतील ती वेळ, त्यावर चर्चा करायला तयार आहे. सध्या कोण माझ्याविरोधात उभा राहील माहीत नाही. यापूर्वी मी तीन निवडणूक लढले. भाषण करायला तुम्ही मला निवडून पाठवले आहे. मी अनेक लोकांची संसदेतील भाषणे ऐकते. सरपंचपासून लोकसभेपर्यत प्रत्येक इलेक्शन सिरियसली घेतले पाहिजे.” असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.