बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी आणि धडाकेबाज भाषणासाठी ओळखले जातात. अनेक वेळा अजित पवार हे पहाटेपासूनच अधिकाऱ्यांसोबत आपल्या कामांना सुरुवात करताना दिसले आहेत. तसेच अजित पवार यांनीही खूपदा “मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो”, असं म्हटलं आहे. मात्र, आता याच विधानावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमध्ये बोलताना अजित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
मी सकाळी उठतो, अहो मग दूधवालाही सकाळी लवकरच उठतो. सामान्य लोक लवकर उठतात. ते कुठ लोकांना सांगत सुटतात. तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. तो माझा नाही, तिला चहा करावा लागतो, ही अडचण आहे आणि हे फॅक्ट आहे. सरकारे ही केवळ पाच वर्षासाठी नसतात त्यांनी धोरणात्मक कार्यक्रम राबवायचे असतात. बारामतीत एवढा विकास केला म्हणतात, मग यांना मत का मिळाली नाहीत? असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर जोरदार निशाणा साधला.
मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही
इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता भरणे मतदारसंघांमध्ये पाच हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगत आहेत. हा आकडा म्हणजे काही विनोद नाही. मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही. सत्ता येत असते जात असते. मात्र तुम्ही लोकांचा विचार कधी करणार? कोणी कोणावर उपकार करत नसतं. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतात, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
शरद पवार यांनी बारामतीत नोकरी आणली, एमआयडीसी आणली पाण्याचा प्रश्न सोडवला, सामाजिक परिवर्तन केलं. तर दुसऱ्या नेत्याने म्हणजेच अजित पवार यांनी रस्ते केले आणि इमारती बांधल्या. लोकांना पहिल्या नेत्याचं कामं हवंय. नोकरीच मिळणार नसेल तर रस्ते कशाला हवेत. तुम्ही कामं केली तर तुम्हाला मतं का मिळाली नाहीत, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना विचारला.
तुम्हाला हौस आहे आमदार आणि मंत्री व्हायची
पुढे बोलताना म्हणाल्या, कोणी कुणावर उपकार करत नाही. हे सांगतात आम्ही दिवसरात्र काम करतो. आम्ही तुम्हाला आग्रह केला होता का? तुम्हाला हौस आहे आमदार आणि मंत्री व्हायची. त्यामुळे काम करा. आमच्यावर उपकार करता का? कष्ट सगळेच करतात. लोकांचा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.