केडगाव: दौंड तालुक्यातील दापोडी गावामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा विजेचा धक्का लागून काही दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच अनुषंगाने बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भालेकर कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
दौंड तालुक्यातील दापोडी येथे १७ जून रोजी घरातील तारेत विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसून सुरेंद्र भालेकर, आदिका भालेकर आणि प्रसाद भालेकर या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर गुरुवारी (दि.२०) खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोडी येथे जाऊन भालेकर कुटुंबाची भेट घेतली.
वैष्णवी भालेकर या मुलीचा शैक्षणिक खर्च सुप्रिया सुळे करणार
भालेकर कुटुंबातील मुलगी वैष्णवी नुकतीच इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणार असल्याचे खासदार सुळे यांनी जाहीर केले, तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. महावितरण वीज कंपनीच्या गलथन कारभारामुळेच ही गंभीर घटना घडली आहे, अशी टिका सुळे यांनी यावेळी केली.