पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा उंदराने चावा घेतल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे अहवाल सादर केला. या अहवालानुसार अखेर वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी कठोर पावले उचलत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना तत्काळ पदावरून हटविले असून तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सागर दिलीप रेणुसे (वय-३०) या रुग्णाला १ एप्रिलला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचार घेत असताना त्यांना उंदीर चावल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. त्याच रात्री रेणुसे यांचा मृत्यू झाला होता. त्याचे शवविच्छेदन ससून रुग्णालयात २ एप्रिलला करण्यात आले. त्या अहवालात त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. चौकशी समितीने शवविच्छेदन अहवालासह इतर बाबींची चौकशी करून हा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे सादर केला होता.
या प्रकरणी डॉ. म्हैसेकर यांनी वैद्यकीय अधीक्षकांसह तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली. या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी कारवाई करत रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना तत्काळ पदावरून हटविण्यात आले आहे. याचबरोबर तीन तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना निलंबन का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे. त्यांना यावर उत्तर देण्यासाठी ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.