इंदापूर, (पुणे) : बारामती लोकसभेसाठी नणंद विरुद्ध भावजय सामना रंगण्याची दाट शक्यता आहे. त्यात आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दोघी नणंद- भावजय प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघ पिंजून काढला आहे. तर सुप्रिया सुळेंसाठी वडिल शरद पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एक भावजय जरी विरोधात लढत असली तरी दुसरी भावजय प्रचारासाठी मैदानात उतरली आहे.
दरम्यान, इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या गाव संपर्क दौऱ्यांमध्ये आमदार रोहित पवार यांच्या भगिनी आणि आईने प्रचाराला हजेरी लावली आहे. सुनंदा पवार आणि सई पवार यांनी हजेरी लावत सुप्रिया सुळेच्या प्रचारात उतरल्याचे दिसून आले.
काय म्हणाल्या सुनंदा पवार
सुप्रिया सुळेंना पाठिंबा देत सुनंदा पवार प्रचारार्थ मैदानात उतरल्या आहेत. यावेळी त्या म्हणाल्या, सुप्रीम कोर्टाचा निकाल पाहिला तर घडाळ्याचं चिन्ह गोठवण्याची शक्यता आहे. त्यातच हिसकावून घेतलेले काहीच कोणाला टिकवता येत नाही. ज्यांनी राष्ट्रवादी सुरु केली, वाढवली, राज्य आणि देशपातळीवर नेती त्यांच्याकडूनच घड्याळ हिसकावून घेणं सोपं आहे. मात्र ते टिकवणं तेवढच कठिण आहे. ज्याने सुरुवात केली त्याच्या हातून हिसकावून घेतलेलं घड्याळ किंंवा कोणतीही वसतू लाभत नाही, असं सुनंदा पवार म्हणाल्या..