उरुळी कांचन, (पुणे) : सुजित जाधव यांचे मस्त पुणेकर प्रोडक्शन एक सस्पेन्स थ्रिलर ‘द ट्रॅप’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या सिनेमाचे चित्रीकरण हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, दौंड तालुक्यातील डाळिंब गावात झाले आहे. दरम्यान, उरुळी कांचन येथील जानाई डेव्हलपर्सचे मालक सागर कांचन, उद्योजक संदीप गव्हाणे यांच्या निवासस्थानी व त्यांच्याच जानाई रिसॉर्ट येथे या चित्रपटाचे काही शुटिंग झाले आहे.
मराठी चित्रपट सृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होण्यास सुरुवात झाली आहे. विविध विषय घेऊन कलाकार गावाकडची आगळी वेगळी असणारी व ग्रामीण भागाला साजेल अशी गावरान भाषा व नवीन विषय घेऊन सर्वांसमोर येत आहे. अस्सल गावराण मातीचा तडका असणाऱ्या या चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम पद्धतीने केली असल्याचे सुजित जाधव यांनी सांगितले.
एक सस्पेन्स थ्रिलर ‘द ट्रॅप या सिनेमाची नुकतीच घोषणा झालीय. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही निरनिराळी असते. काहींचे प्रेम हे सफल होते. तर काहींना प्रेमात यातना सहन कराव्या लागतात. प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास. मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला तर त्या प्रेमाचे पुढे काय होते, हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. एकूणच हा चित्रपट फक्त प्रेमकथा नसून आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश असल्याचे सांगीतले आहे.
दरम्यान, या चित्रपटात राणा दा म्हणजे सर्वांचा आवडता अभिनेता हार्दिक जोशी, सुजित जाधव, मोहन जोशी, संजय खापरे, स्वाती लिमये हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. द ट्रॅप सिनेमाचे दिग्दर्शन अमोल खापरे करत असून असोसिएट अभिजित कोळेकर आहेत. निरंजन पत्की हे क्रीएटीव्ह डिरेक्टर असून संयुक्ता तिनघसे आहे. छायाचित्रकार लव्हेश दळी, कार्यकारी निर्माता रत्नेश पन्हाळकर, मेकअप व हेयर विशाखा शिंदे, साउंड स्वरूप जोशी, वेशभूषा वैदेही वैद्य यांनी केली आहे.