उरुळी कांचन, (पुणे) : येथील ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक परिसरात भाड्याने राहणाऱ्या एका २३ वर्षीय अविवाहित तरुणाने वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रविवारी (ता. 30) सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास तळवाडी चौक परिसरात असलेल्या उरुळी विठाई संकुलन येथे ही घटना घडली आहे.
धीरज पांडुरंग हरिहर (वय – २३, मूळ रा. शेलगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. धीरज याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धीरज हरिहर हा एका नामंकित कंपनीत कामाला होता. तसेच मित्रांसमवेत उरुळी कांचन येथे भाड्याने राहत होता. रविवारी सायंकाळी त्याचा एक मित्र धीरजला वारंवार फोन करीत होता. मात्र धीरज फोन उचलत नव्हता. धीरजचा मित्र फोन उचलत नसल्याने धीरज राहत असलेल्या ठिकाणी गेला. यावेळी त्याने दरवाजा उघडला असता धीरजने वायरच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तात्काळ इतर मित्रांना माहिती दिली. उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली.
दरम्यान, धीरज याला नागरिकांच्या मदतीने खाली उतरून कदम रुग्णवाहिकेचे वैजिनाथ कदम व नागरिकांच्या मदतीने उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच धीरज याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सदर ठिकाणी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.