Suicide | पुणे : दारु पिऊन घराच्या दारात शिवीगाळ केल्याने शेजारी राहणार्यांनी घरात शिरुन मारहाण केली. गावात आपल्याला महिलांनी मारहाण केल्याने अपमान झाल्याच्या रागातून रिक्षाचालकाने धानोरी येथील खाणीत उडी मारुन आत्महत्या केली.
अजय शिवाजी टिंगरे (वय ४२, रा. धानोरी गाव) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी अश्विनी टिंगरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ हनुमंत टिंगरे याच्यासह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय टिंगरे हा २३ मार्च रोजी रात्री दारु पिऊन आला. घरासमोर उभे राहून शिवीगाळ करु लागला. तेव्हा शेजारी राहणार्यांनी अश्विनी टिंगरे यांना पतीला समजावले. ११२ ला कॉल केल्यावर पोलीस आले. त्यांनी अजय याला समज दिल्यावर तो घरी जाऊन झोपला.
दुसर्या दिवशी सकाळी शेजारचे जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. त्यांनी झोपेत असलेल्या अजय याला मारहाण करायला सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याला घराबाहेर आणले. फिर्यादी यांनी नवनाथ टिंगरे यांना त्याला मारु नका अशी विनवणी केली. तेव्हा त्यांनी तो मार खाच्या लायकीचाच आहे, मारा, असे सांगितले. लोक जमा होऊ लागल्याने मारहाण करणारे शेजारचे निघून गेले.
विश्रांतवाडी धानोरी रोडवरील खदानीजवळ थांबून उडी मारण्याचा प्रयत्न…
त्यानंतर फिर्यादी या तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात निघाल्या. त्यांच्या मुलीने तक्रार करण्यासाठी ११२ ला कॉल केला. दरम्यान अजय टिंगरे हा मोपेड घेऊन घराबाहेर पडला. त्याच्या मागोमाग त्यांची मुलगी व एक ओळखीचे सोमा गेरंम हे गेले.
गावात महिलांनी मारहाण केल्यामुळे मनाला संताप होऊन अपमानित झाल्याने अजय टिंगरे हा विश्रांतवाडी धानोरी रोडवरील खदानीजवळ थांबून उडी मारण्याचा प्रयत्न केला.तेव्हा सोमा गोरंम यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.त्याने हात झटकून स्वत: खदानीत उडी मारली. त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला.परंतु, त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता. विश्रांतवाडी पोलीस तपास करीत आहेत.