दौंड: दौंड तालुक्यातील एकेरीवाडी येथील ऊसाला रसवंतीसाठी परराज्यातूनही मागणी येत आहे. यामध्ये ऊसाला 3600 ते 3900 रुपये प्रति टन विक्रमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा नेहमी गूऱ्हाळ, साखर कारखान्याऐवजी रसवंतीला ऊस देण्याकडे जास्त आहे. तसेच या गावातील व परिसरातील दिवसभरात जवळपास 190 ते 200 टन ऊस रुसवंतीला जात असून शेतकऱ्यांनाही याचा चांगला फायदा होत आहे.
या वर्षी उत्तर भारतात उन्हाचा चटका काही वाढल्याकारणाने तेथील नागरिक ऊसाच्या रसाला पसंती देत असल्याने ऊसाची मागणी प्रचंड वाढली आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, पुणे, मुंबई येथून एकेरीवाडी व परिसरातील ऊसाला रसवंतीसाठी पसंती मिळत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच एकेरीवाडीतून ऊसाची निर्यात चालू होते. यामध्ये एका ट्रकमध्ये जवळपास 20 ते 22 टनांपर्यंत वाहतूक केली जाते. या परिसरातून हंगामाला 9 ते 10 ट्रॅक रोज भरून जातात. म्हणजे प्रति दिनी 180 ते 200 टन ऊस एजंट मार्फत पाठविला जातो. यावर्षी दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना चालू झाल्याने यावर्षी हंगामात ऊसाची टंचाई निर्माण झाल्याने भावातही विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे.
14 ऊसाची मोळी नायलॉनने बांधली जाते
या परराज्यात जाणाऱ्या ऊसाची तोडणी करताना वाढे छाटले जाते. या ऊसाला वाढया ऐवजी सुतळीचा किंवा नायलॉनचा वापर करत एकूण 14 ऊसाची एकसारख्या पद्धतीने एक मोळी बांधली जाते. ही मोळी तयार करण्यामागे मजुराला 5 रुपये प्रति मोळी याप्रमाणे दर मिळतो. तर वाहतुकीसाठी 3 रुपये तर हमाली 2 रुपये प्रति मोळी असे एकूण 11 रुपये मिळत आहेत. तसेच जनावराच्या चाऱ्यासाठी वाढे मिळतात.
त्यामुळे या भागातील मजुरांना ऊस तोडणीच्या कामातून चांगला रोजगार मिळतो. त्याकारणाने दरवर्षी दुसऱ्या जिल्ह्यातून जवळपास 80 ते 90 मजूर एकेरीवाडी येथे उन्हाळी हंगामात हजेरी लावतात. स्थानिक व बाहेरील मजूर मिळून जवळपास 100 ते 120 लोकांना या माध्यमातून हमकास रोजगार मिळत आहे.
गावातून बाराही महिने रसवंतीगृहासाठी ऊस पाठवला जातो
राज्यमाहार्गाच्या दुतर्फा तसेच शहरी भागातील बस स्थानक, देवस्थाने, वर्दळीच्या ठिकाणी बाराही महिने रसवंतीगृह चालू असतात. बहुतांशी या रसवंतीगृहांना हवा त्या प्रमाणात एकेरीवाडी व परिसरातून बाराही महिने ऊसाचा पुरवठा होतो.
गावाला 20 ते 25 वर्षाची ऊस विक्रीची परंपरा
पूर्वी या गावामध्ये 419 या विशिष्ट जातीच्या रसवंतीसाठी लागणाऱ्या ऊसाचे उत्पादन घेतले जायचे. त्यामुळे पुणे, मुंबई येथून प्रसिद्ध ऊस व्यापारी हे एकेरीवाडी या गावी ऊस खरेदी करण्यासाठी यायचे. ऊस खरेदी करून शहराच्या ठिकाणी पाठवायचे. पण आता याच गावातील काही तरुणांनी या व्यापाराची पूर्ण माहिती घेऊन आता ते तरुण स्वतः ऊस खरेदी करून परराज्यातही पाठवत आहेत.
ऐन उन्हाळ्यात ऊस तोडणीला आल्यावर रसवंतीसाठी ऊस व्यापाऱ्यांना दिला की गुराळे, कारखान्यापेक्षा 300 ते 400 रुपये दर जास्त मिळतो तसेच ऊस लवकर तोडला जातो आणि पैसे ही रोख स्वरूपात मिळतात. तसेच गावातीलच व्यापारी असल्याकारणाने ऊस हमकास खरेदी केला जातो. त्यामुळे आमचा ऊस देण्याचा कल हा नेहमी रसवंतीकडे जास्त असतो.
-संजय टकले, शेतकरी
गेली अनेक वर्ष ऊस व्यापारामध्ये असल्यामुळे संपूर्ण देशातील ऊसाचे दर माहित असल्यामुळे शेतकऱ्यांनाही दोन पैसे जास्त मिळावे या दराने ऊस खरेदी करतो. 50 ते 60 कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो याचे समाधान वाटते.
-मोहनदादा टुले, ऊस व्यापारी