केडगाव: मार्च महिन्याच्या अखेर पासूनच उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा सर्वाधिक त्रास ऊसतोड मजुरांना सहन करावा लागत आहे. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अनेकांना ताप येतो, डोकं दुखते, उलटी होते, पण या त्रासातही ट्रॅक्टर भरून द्यावाच लागतो. त्याला पर्याय राहत नाही. नाईलाजामुळे कितीही त्रास झाला, तरी हे सर्व त्यांना सहन करावे लागते. खूप ऊन असले, तरी ऊस तोडण्याशिवाय काही पर्याय आहे का? असा प्रश्न ऊसतोड कामगार व्यक्त करतात. भर उन्हात ऊसतोडीसह वाहतूक करावी लागत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यापुढे ऊन काहीच नसल्याचे हे मजूर सांगत आहेत. अक्षरशः सूर्य आग ओकतोय, अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. अशा कडक उन्हामध्ये ऊसतोड मजूर जिवावर उदार होऊन ऊसतोड करत ऊस पुरवठा करीत आहेत. अनेकजण भल्या पहाटे फडात जात ऊसतोड करीत आहेत. या वेळी बिबट्याच्या हल्ल्याचा धोकाही ते पत्करत आहेत.
सध्या कडक उन्हाचा मजुरांना मोठा त्रास होत आहे. लहान मुलांचेही मोठे हाल होत आहेत. ऊसतोडीसह त्याची शेतातून बांधापर्यंत वाहतूक करणे, पुढे कारखान्यापर्यंत ऊस बैलगाडीतून नेणे आदी कामे उन्हातच करावी लागत आहेत. अनेकदा डांबरी रस्त्यावरून जाताना बैलांनाही उष्माघाताचा त्रास होत आहे. अनेक मजूर उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून उसाने भरलेल्या गाडीवर छोटेसे छत करीत आहेत. मात्र, उकाड्याचा त्रास व्हायचा तेवढा होत आहे.
लेकराबाळांच्या शिक्षणासाठी आणि घेतलेली उचल फेडण्यासाठी रात्री बेरात्री ऊसाच्या फडात कामासाठी जावं लागतं. तसेच ट्रॅक्टर भरून दिला नाही, तर मुकादम बोलतात. त्यामुळे त्यांची उचल फिटली नाही तर पुढच्या वर्षी याच पैशात ऊस तोडायला यावं लागतं.
– कैलास सोनवणे, ऊसतोड मजुर ( मूळ राहणार बीड )