पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील पर्वती भागातील एका नवविवाहितेने पती व सासूच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. लग्नात हुंडा न दिल्याने तसेच ज्या भेट वस्तू दिल्या त्याही भीक मागून दिल्यावरून नवविवाहितेचा छळ करण्यात आला होता. या घटनेनंतर एकच संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना शहरातील जनता वसाहतीत ३० मे २०२२ ते १८ मार्च २०२३ दरम्यान घडली आहे.
रुकय्या शहानवाज शेख (वय २१, रा. जनता वसाहत, पर्वती) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती शहानवाज कासिम शेख याला अटक केली आहे. तर, सासूवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्ताफ सलिम अन्सारी (वय ४९, रा. कोथरुड) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी रुकय्या हिचा शहानवाज याच्याबरोबर गेल्या वर्षी विवाह झाला होता. तेव्हापासून लग्नात हुंडा दिला नाही म्हणून छळ होत होता. ज्या भेट वस्तू दिल्या, त्या भीक मागून दिल्या असे म्हणून तिला सतत टोचून बोलले जात होते. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून रुकय्या हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सरोदे करीत आहेत.