लखन शोभा बाळकृष्ण
इंदापूर : स्पर्धेच्या युगात मेहनतीशिवाय पर्याय नाही. यश मिळवायचं फक्त बोलून नाही, तर मनगटाच्या जोरावर ते खेचूनही आणायची धमक असावी लागते. त्यासाठी त्याग आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी अंगी असण्यासोबत परिस्थितीशी दोन हात करण्याची असणारी हिंमतही फार गरजेची असते. अशीच एक हिंमत दाखवली आहे, ती म्हणजे इंदापूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडे गावातील पूजा मोहन गलांडे या विद्यार्थिनीने. नुकताच एमपीएससीचा विविध पदांचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पूजा नंदा मोहन गलांडे या विद्यार्थिनीने महसूल सहायक आणि कर सहायक अशा दोन्ही पदांना गवसणी घातली आहे. त्यामुळे पंचक्रोशीत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूजा गलांडे या विद्यार्थीनीने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली. पुजा ही इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक या खेड्यातील आहे. शिक्षणासाठी पुणे गाठल्यावर पदवीचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण करून तिने आपला मोर्चा स्पर्धा परीक्षेकडे वळवला. पुजाचे वडील माथाडी कामगार आहेत, तर आई गृहिणी आहे. पूजा सांगते की, ‘या प्रवासात रोजची मोलमजुरी करून वडिलांनी शिक्षणाचा खर्च पुरवला. तर आईने वेळोवेळी मनोबल वाढविण्याचे काम चोख बजावले, तर भाऊ नेहमी सोबत उभा राहिला, तसेच मित्र मैत्रिणींनीही मोलाची साथ दिली.’
सुरवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी पूजाने पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला. तिच्या निर्णयाला घरच्यांनीही पाठींबा दिला. अभ्यासाला सुरवात केली खरी पण मधेच करोनाची महामारी आली. त्यानंतर परत घरी जावं लागलं. यामध्ये बराच वेळ गेला. करोनाच संकट टळलं आणि तिने पुन्हा पुणे गाठलं. परत अभ्यासाची घडी बसवली, यावेळी मात्र तिने राज्य सेवा आयोगाची परीक्षा द्यायची म्हणून अभ्यासाला सुरवात केली.
कित्येकदा ती यशाच्या जवळ जायची परंतू अंतिम यश मात्र तिच्यासोबत लपंडावच खेळत होतं. एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमध्ये ती अगदी काही गुणांनी गुणवत्ता यादीत येण्यावाचून राहिली. हे सर्व घडत असताना एकीकडे मानसिक पातळीवर होणारी घालमेल, यशाने दिलेली हुलकावणी, आई वडील मेहनत करून आपल्यावर पैसे खर्च करत असल्याची जाणीव या सर्व गोष्टी तिच्या आजूबाजूला पिंगा घालत होत्या. या सर्व परिस्थितीवर मात करत तिने अखेर अधिकारी होऊन दाखवलं.
सकाळच्या 7 पासून ते रात्रीच्या 11 पर्यंत अभ्यासिकेत बसून अभ्यास करायचा. या अभ्यासाच्या दिवसात कधी कधी बिघडणारी तब्बेतही तोंड वर काढत असे. पण आपल्याला होणाऱ्या त्रासकडे दुर्लक्ष करून पूजाने आपला अभ्यास अविरत सुरूच ठेवला. या सर्वांमागची तिची प्रेरणा होते ते म्हणजे तिच्यासाठी पाठीवर ओझे वाहणारा बाप आणि घर सांभाळत सर्वांची काळजी घेणारी आई. त्यांच्याकडे बघून सारे त्राण झटकून पुन्हा अभ्यासाला लागायची. असं ती सांगत असते.
‘वडिलांच्या पाठीवरच ओझं मला कमी करायचं आहे’, असं पूजा सारखं मित्र मंडळींमध्ये म्हणत असे. अखेर तो शद्ब तिने खरा करून दाखवला. एका पूर्व परीक्षेचा निकाल लागला आणि पूजाने घरी वडिलांना कॉल केला तेव्हा वडिलांचे बोल होते ‘तुला काही कमी पडू देणार नाही, तू लढत रहा..’, ही गोष्ट सांगताना कित्येकदा पुजाच्या डोळ्यात नकळत पाणी आल्याचं तिचे मित्र मैत्रिणी सांगत असतात.
पूजाला याच यशावर थांबायचं नाही तर ती एमपीएससीमधून क्लास वन अधिकारी होण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहे. तिने मिळवलेल्या यशाने तिच्या कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एक विशेष म्हणजे पूजा गलांडे ही गलांडवाडी नंबर एकमधील सरकारी नोकरी मिळवणारी पहिली मुलगी ठरली आहे. या प्रवासात कुटूंबियांसोबत मित्र मंडळींचाही मोठा वाटा असल्याचे ती सांगते. पूजाने मिळवलेलं यश हे गावातील इतरही मुलींना प्रेरणा देणारं ठरणार आहे.
तिच्या यशाबद्दल काय बोलावं कळत नाही, इतकंच की सर्व गावातून तिचं कौतुक होतंय याचा आनंद आहे. मी पण माझ्या परीने कुठे कमी पडणार नाही याची दक्षता घेत आलो. त्याच मेहनतीचं फळ तिने आम्हाला दिलं.
मोहन गलांडे, पूजाचे वडील
तिच्या यशाने छान वाटत आहे. तिनेही आम्हाला कधी त्रास दिला नाही. आमच्यासोबत गावाच्याही अपेक्षा होत्या त्या तिने पूर्ण केल्या. शेवटी मुलगी अधिकारी झाली याचं समाधान आहे.
नंदा गलांडे, पूजाची आई