पुणे : मिटर चोरीचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई न करण्याकरीता चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने आरोपीकडे तब्बल ५ लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, लाच लुचपत विभागाने सापळा लावून तडजोडअंती ३ लाख रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तान्हाजी सर्जेराव शेगर, पोलीस उप निरीक्षक, (वर्ग-२), चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ४० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे महावितरण विभागात नोकरीस आहेत. तक्रारदार यांचेविरूध्द चंदननगर पोलीस ठाण्यात मिटर चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर, यांनी सदर गुन्ह्याचा तपास ते स्वतः करीत असल्याचे सांगून सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांचेविरूध्द पुढील कारवाई न करण्याकरीता तान्हाजी शेगर यांनी ५ लाख रूपयाची लाचेची मागणी केली होती.
दरम्यान, तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, पोलीस उपनिरीक्षक तान्हाजी शेगर यांनी तक्रारदार यांचेविरूध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे दाखल असणारे मिटर चोरीचे गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई न करण्याकरीता ५ लाख रूपयांची मागणी करून, तडजोडीअंती ३ लाख रुपयांची लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाल्याने चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रूपेश जाधव हे करत आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.