पिंपरी-चिंचवड : स्टंटबाजी करून जीव गमावल्याच्या घटना सातत्याने घडत असताना देखील स्टंटबाजी सुरूच असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील एका तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून हा तरुण स्टंटबाजी करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या स्टंटमुळे तरुणाच्या जीवाला धोका आहे. या तरुणाचा शोध वाहतूक पोलीस घेत असून, तरुणावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली.
पिंपरीतील हा तरुण जीवावर बेतेल अशा पद्धतीने धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून स्टंटबाजी करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पिंपरी- चिंचवड शहरातील असून, तरुणावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, बिनधास्तपणे हा तरुण गाडीच्या टपावर बसलेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर भितीचा लवलेशही नाही, असे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. या व्हिडीओच्या आधारे तरुणाचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली. कोणीही जिवावर बेतेल अशी स्टंटबाजी करू नये, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.