इंदापूर: विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून प्रयत्नपूर्वक कार्याच्या माध्यमातून परीक्षेत यश संपादन करावे, असे इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही क्षेत्रातील आपले ध्येय निश्चित करून सातत्याने पहिल्यापासून प्रयत्न केल्यास आपण यश संपादन करू शकतो, असेही त्यांनी म्हटले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाने राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारावी बोर्ड परीक्षा मार्गदर्शन आणि निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सूर्यकांत कोकणे बोलत होते.
गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात म्हणाले की, ‘परीक्षेच्या अभ्यासाचे योग्य नियोजन करून परीक्षेची तयारी करावी. आपले यश आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करावे. सर्व शिक्षक, विद्यार्थी कल्याणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात.’
सासवड येथील वाघिरे कॉलेजच्या व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. संजय लांडगे म्हणाले की, ‘परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व भीती न बाळगता जिद्द व चिकाटीच्या जोरावर मन शांत ठेवून मी विजेता होणार या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊन परीक्षेत यश संपादन करावे.’
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांनी केलेले मार्गदर्शन आपल्या स्मरणात ठेवून कार्य करावे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच त्यांनी महाविद्यालयातील उपक्रमाविषयीची माहिती दिली.
यावेळी डॉ. भिमाजी भोर, डॉ. शिवाजी वीर, डॉ. भरत भुजबळ, कॉन्स्टेबल रोशन मुटेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजीव शिरसट व प्रा. बापू घोगरे यांनी केले. आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अमित दुबे यांनी मानले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.