पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा विध्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विद्यापीठातील आदर्श कॅन्टीन परिसरात शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. हॉस्टेलच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरील पोस्ट डिलीट केल्यावरून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे विद्यापीठातील बॉइज हॉस्टेल या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका विद्यार्थ्याने पुणे लोकसभा निवडणुकीसाठी उभा असलेल्या एका उमेदवाराची पोस्ट शेअर केली होती. ती राजकीय असल्याने अॅडमिन विद्यार्थ्याने ती पोस्ट डिलीट केली. यावरून युवा सेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सात ते आठ जणांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा तपास चतुश्रृंगी पोलिस करीत आहेत.