उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी कर थकबाकी वसुलीसाठी ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारपासून (ता. ०२) धडक कारवाई सुरु केली आहे. वारंवार आवाहन करूनही कर थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या नळ जोडण्या खंडित केल्या जात असून आतापर्यंत २५ हुन अधिक नळ जोडण्या तोडण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन व ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी दिली.
आर्थिक वर्षे पूर्ण झाले तरी थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी कर विभागाकडून नळजोडणी खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. थकबाकी न भरता तोडलेले नळ जोडल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. शहरात घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम जोरदार सुरू आहे. परंतु घरपट्टी व पाणीपट्टी वसुली असमाधानकारक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व विविध कर विभागाने थकीत पाणीपट्टी धारकांविरोधात मोहीम हाती घेतली आहे.
ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टीच्या वसुलीने अवघा ३५ टक्केचा टप्पा गाठलेला आहे.
या ग्रामपंचायतीची एकुण घरपट्टी व पाणीपट्टी कर वसुल पात्र रक्कम सुमारे ९ कोटी १५ लाख रुपये असुन यासाठी एकुण ९ हजार ५०७ खातेदार आहेत. आजपर्यंत फक्त सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये वसूल झाले आहेत. थकबाकीच्या रकमेचा विचार केला तर जास्तीत जास्त ६ लाख ६९ हजार व कमीत कमी एक हजार रुपये अशा स्वरुपात खातेदारांकडे आहे.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करावे असा प्रस्ताव सुमारे १४ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने शासनाकडे दिलेला आहे. पुणे शहरा पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावातून रेल्वे, एसटी, पीएमटी बस या दळणवळण सुविधा चांगल्या प्रमाणात असल्यामुळे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे.
याबाबत बोलताना ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस म्हणाले, “खातेदारांना मूलभूत सुविधा पुरविताना एखाद्या सुविधेचा अभाव राहिला तर तातडीने प्रशासनाकडे आपल्या जवळच्या ग्रामपंचायत सदस्यामार्फत तक्रार केली जाते. सदस्यांनी कर वसुलीच्या संदर्भात खातेदारांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे. जर खातेदारांनी थकीत कर भरले नाहीत तर नळ जोड तोडणे, मल निसा:रण, पाईप लाईन बंद करणे अशा कारवाईला नागरिकांना सामोरे जावे लागेल.
याबाबाबत बोलताना सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, “थकबाकी अदा केल्यानंतर नळजोडण्या पूर्ववत केल्या जाणार असून, उरुळी कांचन मधील नागरिकांनी ग्रामपंचायतीला आपल्या कराची थकबाकी त्वरित भरून सहकार्य करावे”