उरुळी कांचन : शिरुर-हवेली मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून अखेर आज सोमवारी (ता. 04) अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिरूर-हवेलीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यात थेट लढत होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज सोमवारी शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच प्रदीप कंद हे निवडणूक लढण्यावर ठाम राहतात की अर्ज माघारी घेतात, याकडे शिरूर-हवेलीसह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार? याची चर्चा शिरूर-हवेलीत रंगली आहे.
कोणत्याही परिस्थितीत या वेळेस महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार अशोक पवार यांना निवडून आणण्यासाठी दोन्ही बाजूने कंबर कसण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना ही निवडणूक सोपी नक्कीच नसणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप कंद यांना चांगल्या पदावर संधी देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची ग्वाही दिल्यामुळे कंद यांनी तलवार मान्य केली आहे. पुणे जिल्ह्यात काही मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदीप कंद हे शिरूर-हवेलीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रयत्नशील होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप कंद यांची समजूत काढून आपला अर्ज माघारी घेण्याची सूचना फोनवर दिल्याने कंद यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करुन अर्ज माघारी घेण्याचे ठरवले.
यावेळी बोलताना पै. संदीप उत्तमराव भोंडवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा फॉर्म मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. भाजपा शिरुर विधानसभा प्रमुख प्रदीप कंद यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करुन मैत्रीपूर्ण लढतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रदीप कंद यांच्या या निर्णयास विधानसभा संयोजक, शिरुर भाजपा अध्यक्ष, हवेली भाजपा अध्यक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा, विविध आघाड्या व शिरूर हवेलीमधील बहुतांशी पदाधिकाऱ्यांचा पाठींबा होता.
दरम्यान, जगदीश मुळीक यांच्या निवासस्थानी शनिवारी (ता. 02) प्रदीप कंद यांच्या समवेत शिरूर-हवेलीच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनंतर प्रदीप कंद यांनी फॉर्म मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिरूर-हवेलीमधील भाजपाची एकी अंखडीत राहण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत प्रदीप कंद यांना साथ दिली, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, असे भोंडवे म्हणाले.
11 जणांची माघार
भाजप नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्यासह कटके मनिषा ज्ञानेश्वर, शिवाजी ज्ञानदेव कदम, प्रकाश सुखदेव जमधडे, सुरेश लहानु वाळके, जगदीश भागचंद पाचर्णे, भाऊसाहेब बाळासाहेब जाधव, पंढरीनाथ मल्हारी गोरडे, शांताराम रंगनाथ कटके, शिवाजी किसन कुऱ्हाडे, दाभाडे गणेश कुंडलिक यांनी देखील माघार घेतली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी सांगितले.