हडपसर (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारु पिण्यासाठी घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.
दिलीप कृष्णराव नाईक (वय ४७, रा. फ्लॅट नं २०३, विहार कॉम्प्लेक्स, म्हसोबा वस्ती, झेड कॉर्नर, मांजरी (बु), ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील घावटे व्हिजन बिल्डींग, घावटे वस्ती, मांजरी ब्रुद्रुक, पुणे येथे रविवारी (ता. १८) भरदिवसा घरातील लॅपटॉप व मोबाईल अज्ञात चोरट्याने लबाडीने चोरल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी गुन्हे शाखा, युनिट-५ कडील पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे व स्टाफ यांनी भेट देऊन तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एका संशयित व्यक्तीकडे चोरीचा लॅपटॉप व मोबाईल असून, तो विक्री करण्यासाठी के. के. घुले चौक, मांजरी, पुणे येथे संशयितरित्या वावरत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे मांजरी येथून एका संशयित व्यक्तीला लॅपटॉप, लॅपटॉप बॅग व रेडमी कंपनीच्या मोबाईलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने दारु पिण्यासाठी पैसे पाहिजेत म्हणून लॅपटॉप व मोबाईल फोन चोरी करुन ते विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. यावरुन हडपसर पोलीस ठाण्याकडील गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यातील ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक युनिट ५, गुन्हे शाखा विष्णु ताम्हाणे, पोलीस अंमलदार अमित कांबळे, दया शेगर, पल्लवी मोरे, स्वाती गावडे, पांडुरंग कांबळे यांनी केली आहे.