पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) लोकसहभागातून थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारला जात आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कामाची पाहणी केली. श्रीमंत बाजीराव पेशवे देशाच्या इतिहासातील झंझावाती व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांचे कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे पाटील यांनी या वेळी सांगितले. तसेच बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याच्या कामाप्रती समाधान व्यक्त केले.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून एनडीएमध्ये पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी एनडीए येथे जाऊन पुतळा उभारणीच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुंदनकुमार साठे, भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शिल्पकार विपुल खटावकर, स्कवॅड्रन लीडर प्रकाश शिंदे, मेजर राहुल शुक्ला, कर्नल रमीनदर सिंग या वेळी उपस्थित होते.
या वेळी बोलताना पाटील म्हणाले की, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून एनडीएमध्ये पुतळा उभारण्यात येत आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे हे देशाच्या इतिहासातील झंझावाती व्यक्तीमत्व होते. त्यांनी केवळ युद्धभूमीवरच आपले कौशल्य सिद्ध केले नाही. तर उत्तम प्रकारे प्रशासन सांभाळले. उद्याच्या तरुण पिढीसाठी त्यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.