पुणे : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांची जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे नुकतीच बैठक पार पडली. यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन ३ व ४ फेब्रुवारीला पार पडले. दरम्यान, संघटनेची नवीन कार्यकारीणीची पहिली बैठक पुणे येथे पार पडली. यावेळी राज्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत कर्मचा-यांच्या अनेक मागण्यांबाबत चर्चा झाली.
महसूल सहाय्यक संवर्गाची वेतश्रेणी, महसूल विभागाचा आकृतीबंध, नायब तहसिलदार संवर्गाचा ग्रेड पे, कर्मचा-यांचे वेतन वेळेत होणे आदी महत्त्वाच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्यास लोकसभा निवडणूक संपताच राज्यभरात तीव्र आंदोलने छेडली जातील, असे प्रतिपादन राज्य अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी केले.
यावेळी संघटनेचे सरचिटणीस प्रशांत कापडे, कार्याध्यक्ष दिलीप कोलेवाड, उपाध्यक्ष कैलाश कोळेकर, विलासराव कुरणे, प्रविण शिरशीकर, सचिन तांबोळी, सचिन तारु, मिलिंद पोळ, निर्मला चौधरी, पल्लवी कोकाटे, अंकुश आटोळे, प्रकाश धानेपकर, शारदा गोरे, विनायक राऊत, मारुती कुचेकर, महिला प्रतिनिधी शोभना मेश्राम, विभागीय अध्यक्ष सागर कारंडे आदी उपस्थित होते. दरम्यान, हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे माजी राज्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.