पुणे: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ अंतर्गत २०२४-२५ ते सन २८-२९ या कालावधीत योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने राज्य हिस्सामध्ये ५० हजार रुपयांची अतिरिक्त वाढ केली आहे.
राज्य शासनाच्या विविधराज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत सन २०२४-२५ या कालावधीत प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना राज्य हिश्यातून ५० हजार रुपये अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता दिली आहे. नव्याने मंजूर केलेल्या अतिरिक्त पन्नास हजार रुपये रकमेमधून ३५ हजार रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी, तर पंधरा हजार रुपये अनुदान हे प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून छतावर एक किलो वॅट योजनेपर्यंत सौर ऊर्जायंत्रणा उभारणी करण्याकरिता अनुदान देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घर या धोरणातून राज्यातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर ‘मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत योजना पुणे जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात. या बेघर लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजनांमध्ये देण्यात येणाऱ्या अनुदानाचा भाग म्हणून आतापर्यंत एक लाख वीस हजार अनुदान, मनुष्य दिन महाराष्ट्र राज्य, ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यापूर्वी लाभ न घेतला असल्यास १२ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येत होते.