Rasta Roko Protest : गणेश सुळ / केडगाव : पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुला येथील सेवा रस्त्यावरील खड्डे तातडीने व कायमस्वरूपी बुजवावेत, यासाठी रोड प्रशासन दखल घेत नसल्याने बोरीपार्धी, धायगुडे वाडी व चौफुला ग्रामस्थांच्यावतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
या सेवा रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने रात्रीच्या वेळी वाहनचाकांना अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात होतात. येथील प्रवास हा मुठीत जीव धरून करावा लागतो. शाळकरी मुले, नोकरदार वर्ग, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, प्रवासी, व्यावसायिकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. याबाबत अनेकदा तक्रारी देखील केल्या. मात्र, प्रशासन दखल घेत नसल्याने आम्हाला आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन बोरीपार्धीचे सरपंच सुनील सोडनवर यांनी केले.
आंदोलन सुरू केले असता यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, बारवकर, कुतवळ यांनी निवेदन स्वीकारले व संबंधित अधिकारी वर्गाला सूचना देऊन तातडीने कामाला सुरुवात करण्यास सांगितले. महामार्ग अधिकाऱ्यांनीही तातडीने कामाला सुरुवात केली. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने परिसरातील सर्व नागरिक व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
याप्रसंगी ‘भिमा पाटस’चे आनंद थोरात, सरपंच सुनील सोडनवर, संपत मगर, संजय धायगुडे, रघुनाथ सरगर, दिनेश गडद्ये, सिद्धेश्वर सरगर, राजू कोळपे, डॉ. हंडाळ व परिसरातील अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
बोरीपार्धी व चौफुला येथील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे झोपलेल्या प्रशासनाला जाग आली. महामार्ग अधिकाऱ्यांनी तातडीने कामाला सुरुवात देखील केली. या २ ते ३ फुटांच्या खड्ड्यांमुळे त्रस्त प्रवाशी वर्गाला लवकरच यातून सुटका मिळेल.
– आनंद थोरात, मा. अध्यक्ष, भिमा सहकारी साखर कारखाना, पाटस