पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंगार गोळा करण्याच्या कारणावरून दोघांनी एका मजूरावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना शुक्रवारी १२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपरी येथील भाजी मंडई जवळील पुलाखाली घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.
याबाबत महेश आंबादास करनाके (वय-38 रा. पिंपरी भाजी मंडई जवळ, मुळ रा. कार्ला चौक, जि. वर्धा) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राजु लालबहाद्दुर प्रसाद (वय-31 रा. पिंपरी भाजी मंडई, मुळ रा. गावखेडी, ता. खेरी) याला अटक केली असून त्याचा साथीदार रवि सुर्यवंशी (वय-35 रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश करनाके हे पिंपरी भाजी मंडईजवळ भंगार गोळा करत होते. त्यावेळी भंगार गोळा करत असताना दोघांमध्ये बाचाबाची झाली. याचाच राग मनात धरून आरोपीने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावरुन आरोपी राजू प्रसाद याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, त्याचा साथीदार फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करत करत आहेत.