ST Revenue in diwali : पुणे : राबवलेल्या विविध धोरणांमुळे एसटी आता सर्वांना आवडायला लागली असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या दिवसांसह नोव्हेंबरमधील पहिल्या पंधरवड्यात एसटीला प्रवाशांनी प्रवासासाठी प्रथम पसंती दिली आहे. यामुळे एसटी महामंडळाने ३२८.४० कोटींचा महसूल मिळवला आहे. तर, भाऊबीजेच्या मुहूर्तावर अर्थात १५ नोव्हेंबरला सर्वाधिक ३१.६० कोटींची कमाई एसटी महामंडळाने केली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातून ५५ कोटी २ लाखांचा महसूल महामंडळाच्या तिजोरीत जमा झाला आहे. ठाणे विभागाने १३ कोटी ६७ लाखांची कमाई करत अव्वल स्थान मिळवले आहे. सर्वात कमी उत्पन्न सिंधुदुर्ग विभागाचे ५ कोटी १४ लाख इतके आहे. मात्र, ती कसर एसटीने गणेशोत्सव काळात भरून काढली होती. 91 कोटींचा महसूल एसटीने गणेशोत्सवात जमा केला होता. गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२२ मध्ये महामंडळाने २३१ कोटींचा महसूल मिळवला होता. त्यामुळे यंदा जास्त उत्पन्न मिळाल्यामुळे हीएक सुखकर बातमी आहे.
सहा प्रदेशापैकी पुणे प्रदेशाने ८१ कोटीं ६१ लाखांचा सर्वाधिक महसूल महामंडळाला दिला आहे. अमरावती प्रदेशाने सर्वात कमी अर्थात ३२ कोटी २२ लाखांचा महसूल मिळवला आहे. राज्यातील ३१ विभागांपैकी पुणे विभागाने २१ कोटी ४४ लाखांचे उत्पन्न मिळवून अग्रकमांकाचा मान पटकावला आहे. सर्वात कमी उत्पन्न गडचिरोली विभागाने ३ कोटी ८२ लाख इतके प्राप्त झाले आहे.