लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर – सासवड मार्गावरील दिवे घाटात परिवहन महामंडळाची एस. टी. बस हि रस्त्याच्या बाजूला आलेल्या चरित कोलंडली असल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. 12) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ४ ते ५ प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घाटाच्या चौथ्या वळणावर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला. डोंगराच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यालगतच्या चारीमध्ये एसटी गेल्याने अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस हि ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी या डेपोची असून जेजुरी बाजूकडून पुण्याच्या बाजूकडे निघाली होती. यावेळी दिवे घाटात आली असता ट्रक चालकाने एसटी बस ला कट मारला. त्यामुळे सदरची बस हि रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत गेली. यावेळी अपघात झाल्यावर चालक भीतीने तेथून पळून गेल्याचे प्रवाशांनी सांगितले.
दरम्यान, ट्रकचालक न थांबता त्या ठिकाणावरून निघून गेला. एसटी मधील प्रवाशांना दरवाजातून खाली उतरता येत नव्हते. यावेळी त्या ठिकाणावरून निघालेले सचिन हरपळे, सुहास हरपळे, वैभव हरपळे, ओमकार हरपळे यांच्या सहकार्याने बाहेर काढले व जखमींना रुग्णालयात खाजगी गाडीतून दाखल करण्यात आले. या एसटीमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते.