लोणी काळभोर, (पुणे) : ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, जय जिजावु-जय शिवराय… जय जय भवानी, जय जय शिवाजी… छत्रपती शि्वाजी महाराज की जय.. अशा विविध जयघोषात कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पूर्व हवेलीतील सर्वात मोठ्या लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील समस्त नागरिकांनी एकत्र येत “दोन गावे एकच शिवजयंती” साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका येथून रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली.
यावेळी या मिरवणुकीत भगव्या साड्या व भगवे फेटे परिधान करून फेरीत सहभागी झालेल्या महिला लक्ष वेधून घेत होत्या. यावेळी रेनबो इंटरनॅशनल स्कूल व अँजेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
पालखीच्या समोर रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन तलवार बाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, साहसी धाडसी खेळ, लेझीम पथक, शिवकालीन वेशभूषा परिधान केली होती. स्कूलच्या RSP Troop ने मिरवणुकीचे संचालन व वाहतूक नियमनामध्ये मोलाचे सहकार्य केले. लेझिम खेळाचे सादरीकरण केले. तसेच विविध उपक्रम राबवून उपस्थित नागरिकांची मने जिंकली. कन्या प्रशाला हायस्कूल, पृथ्वीराज कपूर हायस्कूल, पृथ्वीराज कपूर इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात लोणी कॉर्नर पासून मिरवणुकीचे स्वागत केले.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील शिवप्रेमींनी भगवे ध्वज हातात घेऊन, भगव्या रंगाचे फेटे बांधून ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेम, आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण मिरवणुकीत गर्दी करताना दिसत होते.
अनेक लहान मुलांनी शिवरायांच्या तसेच लहान मुलींनी जिजाबाईंची वेशभूषा परिधान केलेली दिसत होती. एकूणच दोन्ही गावांचे वातावरण भगवे झालेले आढळून आले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारी एक गाव एक शिवजयंती मिरवणुकीचे स्वागत आलमगीर मज्जित ट्रस्ट यांच्या वतीने पाणी वाटप करून करण्यात आले. ट्रस्टच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी घोषणा की जय घोषणा देत मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीस उपस्थित होते.
दोन्ही गावातील भजनी मंडळं या मिरवणुकीत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सामील झाली होते. जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष देत मिरवणुकीचे वातावरण अत्यंत भक्तीमय झाले होते. मिरवणुकीच्या उद्घाटन प्रसंगी दोन्ही गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील आजी-माजी सरपंच विविध संस्थेचे पदाधिकारी माता भगिनी यांनी नारळ वाढूवून मिरवणुकीची सुरुवात केली.
दरम्यान,मिरवणुकीला लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वारिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरात पोलिसांनी दिवसभर चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच मिरवणुकीच्या पुढे व पाठीमागे डॉक्टर, मेडिकल, व रुग्णवाहिकेची स्वतंत्र सोय करण्यात आली होती. रात्री ८ वाजता जन्माचा पाळणा झाल्यानंतर शिवालय महादेव मंदिर या ठिकाणी उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भक्ती शक्ती चौक अंबरनाथ मंदिर येथे चित्रकला वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.