उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकड्या पुलावरील संरक्षक कठडा तुटल्याने वाहनांसाठी हा एकप्रकारे मृत्यूचा सापळाच बनला आहे. उरुळी कांचनकडून हडपसरच्या बाजूकडे जाताना वाकड्या पुलावर डाव्या बाजूला संरक्षक कठडा नसल्यामुळे त्यावरून प्रवास करणारे वाहने थेट त्या ठिकाणी असलेल्या ओढ्याच्या 50 ते 60 फूट कोसळून मोठा अपघात घडण्यासाठी एकप्रकारे आमंत्रणच दिले जात आहे.
याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक मालवाहू ट्रक कठडा तोडून थेट ओढ्यात कोसळल्याची घटना घडली होती. याबद्दल माहिती असतानाही प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर रंगरंगोटी, रस्त्याचे दुरुस्तीचे काम काही ठिकाणी सुरु आहे. मात्र, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कडून (एनएचएआय) एवढ्या मोठ्या व गंभीर बाबीकडे कुठल्याही अधिकाऱ्यांचे लक्ष गेले नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरून दररोज हजारो वाहने या महामार्गावरून वाहतात. हजारोंच्या संख्येने रोज वाहने प्रवास करतात. पुणे, हडपसर, लोणी काळभोरसह परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. छोट्या व मोठी अवजड वाहने, स्कूल बस, नोकरदार, कामगार हे सर्व याच रस्त्यावरून प्रवास करतात. दुर्दैवाने जर वाहन खाली कोसळले तर जवळपास 60 फूट खोल नदीत कोसळून जीवितहानी होऊ शकते.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बोरकरवस्ती परिसरातील ओढ्याच्या पुलावरील कठडाही तुटलेल्या अवस्थेत आहे. यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय या ठिकाणावरून अष्टविनायकापैकी एक असलेल्या चिंतामणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वाहनांची गर्दी मोठी असते. तसेच लोणी काळभोर येथे विविध कंपन्या, शाळा-कॉलेजची संख्या मोठी असल्याने याठिकाणी वाहनांची संख्याहि मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी गर्दी ही मोठ्या प्रमाणात असते.
वाकड्या पुलावर वाढले अपघाताचे प्रमाण
या पेठ, नायगाव, व प्रयागधामसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसेच या ठिकाणावरून जाणाऱ्या कामगार वर्गांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाकड्या पुलावर मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहेत. त्या ठिकाणी कठडा नसल्यामुळे मोठी घटना घडू शकते. तो कठडा बसवला जावा. तसेच महामार्गावर दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसविण्यात यावे, त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल.
– सुरज चौधरी, माजी सरपंच, पेठ, ता. हवेली.
प्रशासनाने त्वरित संरक्षक कठडा बसवावा
महत्त्वाच्या रस्त्यावरील पुलावर कठडा नसणे हे अत्यंत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर आहे. प्रशासनाने त्वरित संरक्षक कठडा बसवावा. यामुळे मोठा अपघात व जीवितहानी टाळू शकेल. तरी संबंधित विभागाने त्वरित त्या ठिकाणी कठडा बसवावा.
– अशोक चौधरी, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, सोरतापवाडी, ता. हवेली.