उरुळी कांचन, (पुणे) : मागील अनेक वर्षापासून गरिबांचा आहार मानली जाणारी ज्वारी उत्पादन घटल्याने महागली आहे. उत्पादनातील घट अन दुष्काळी वातावरणामुळे ज्वारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात ५५ ते ७० रुपये किलो ज्वारीचे दर पोचले असल्याने ज्वारीची भाकर गरिबांच्या ताटातून गायब होऊ लागली आहे.
बाजरीनेही ३५ ते ४० रुपये दर गाठला आहे. सर्वसाधारण गहू मात्र ३५ ते ४० रुपयांवर टिकून आहे. काही वर्षांपूर्वी चपाती, पोळी ही सामान्यांच्या घरी सणासुदीलाच व्हायची. ज्वारीची भाकरी हेच भुकेला दररोज उपयोगी पडायची. हरित क्रांती, शेतीत आलेली अत्याधुनिक तंत्रज्ञान, शेतकऱ्यांतील जागरूकता यामुळे देशातील गव्हाचे उत्पादन वाढले. त्यामुळे सामान्यातील सामान्य कुटुंबातही चपाती, पोळी दररोज होऊ लागली.
ग्रामीण शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रमुख अन्न म्हणून भाकरी ओळखली जाते. धान्य, वैरण या हेतूने शाळूची लागवड केली जाते. ग्रामीण भागात भाकरीला पसंती असली तरी शहरी भागात मात्र उलट चित्र आहे. चपाती खाणाऱ्यांचे प्रमाण शहरात अधिक आहे. गव्हाला मागणी असल्याने ज्वारीचे पीक कमी प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी गव्हापेक्षा ज्वारीचा दर कमी असायचा. परंतु भाकरीचे शरीराला होणारे फायदे बघून पुन्हा एकदा अनेकजण भाकरीकडे वळत आहेत. दिवसेंदिवस ज्वारीचे दर वाढत आहेत.
गतवर्षी दिवाळीनंतर शाळूच्या तुटवड्यामुळे दर वाढले. यंदा पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली. दिवाळीपूर्वी ज्वारी हि दर ३५ रुपये पर्यंत मिळत होती. परंतु दिवाळीनंतर स्थानिक बाजारात हायब्रीड ज्वारी पुरेशी आली नाही. जो आला तो कमी प्रतीचा आहे. त्यामुळे उपलब्ध शाळू वाढला आहे. त्याचा किरकोळ बाजारातील दर ४५ ते ५० रुपये झाला. शाळूने प्रथमच “हाफ सेंच्युरी’ गाठली आहे.
दरम्यान, गरीबा घरची भाकरी श्रीमंतांना गोड वाटू लागली आहे. भाकरी हलके अन्न असल्यामुळे अनेक कुटुंबात त्याचा समावेश असतो. आठवड्यातील किमान पाच-सहा दिवस भाकरी, बदल म्हणून एक-दोन दिवस चपातीची प्रथा पुन्हा सुरू झाली. शहरी भागातदेखील शाळूला मागणी वाढू लागल्यामुळे दर वाढू लागलेत.
ज्वारी खाण्याचे फायदे..
■ज्वारीची भाकरी खाण्याने ज्वारीतील लोह आणि तांबे यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.
■ ज्वारीत प्रोटीन भरपूर असतात.
■ रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
■रोगप्रतिकारक शक्त्ती मजबूत राहते.
■ शरीरातील पेशींना ऊर्जा मिळते.
■ ज्वारी खाण्याने दिवसभर उत्साह राहतो
■ गव्हाच्या चपातीपेक्षा भाकरी पचनास हलकी असते.
‘शेतकरी असल्याने लहानपणापासूनच ज्वारीची भाकरी खातो. ज्वारीची भाकरी पचनास सोपी असल्याने रोगप्रतिकारक शक्त्ती मजबूत करते. ज्वारीची आवक कमी झाल्याने बाजारात ५० ते ६० रुपये प्रतीकिलो ज्वारी पोहचली आहे. त्यामुळे कुटुंबातील आर्थिक गणिते बिघडली आहेत.
रेखा बोडके, गृहिणी, लोणी काळभोर, ता. हवेली