सागर जगदाळे
भिगवण : भुसार शेतमाल विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजारामध्ये ज्वारी ७ हजार रुपये प्रति क्विंटल तर मका २,२८१ रुपये प्रति क्विंटल या उच्चांकी दराने विक्री झाली.
इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजाराच्या ठिकाणी शेतमालाची उघड लिलावाने विक्री, चोख वजनमाप व विक्रीनंतर शेतकऱ्यांना हिशोबपट्टी तसेच त्वरीत रक्कम दिली जाते. तसेच शेतमाल विक्रीस अनुशंगिक सुविधा आणि अद्ययावत मार्केट उभारणी यामुळे शेतकऱ्यांना सेवा-सुविधा देण्यास बाजार समिती अग्रेसर आहे, असे मत बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहीत मोहोळकर व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केले.
समितीच्या दैनंदिन डाळींब बाजारामध्ये डाळींब विक्री किमान २० ते १८१ रुपये, पेरु १० ते ४१ रुपये, सिताफळ २१ ते ८५ रुपये प्रति किलो आणि चालू सप्ताहात कांदा मार्केटमध्येही कांदा विक्री प्रति क्विंटल १ हजार ते ४,५०० रुपये या दराने झालेली आहे. तर मासळी मार्केट इंदापूर व भिगवण येथे दैनंदिन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असून, खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतून मागणी आहे.
बाजार समितीने शेतकरी बांधवांच्या शेतीमालास चांगला दर मिळावा या उद्देशाने मुख्य बाजार इंदापूर, अकलूज रस्त्यालगतच्या बाजार आवारात धान्य सफाई यंत्र सुविधा उभारली असून, प्रति तास ५ मेट्रीक टन क्षमतेने धान्य सफाई केली जाते. तसेच शेतमाल तारण योजनाही बाजार समिती राबविते. याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेरु मार्केट खरेदी-विक्रीला प्रतिसाद
बाजार समितीने मुख्य बाजार इंदापूर मार्केट येथून ६० मेट्रीक टन, शिवलिलानगर-इंदापूर अकलूज रस्त्यालगत ८० मेट्रीक टन, उपबाजार भिगवण, निमगांव-केतकी व वालचंदनगर याठिकाणी ६० मेट्रीक टन क्षमतेचे भुईकाटा (वे-ब्रिज) असून, त्यांची २४ तास सेवा उपलब्ध आहे. बाजार समितीने मुख्य बाजार इंदापूर येथे नव्याने सुरु केलेले पेरु मार्केट खरेदी-विक्री कामकाज सप्ताहातून सोमवार, बुधवार व शुक्रवारी चालू असून, त्यास शेतकरी व व्यापारी वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
बाजार समितीच्या उपक्रमांचा लाभ घ्यावा
शेतकरी बांधवांनी बाजार समितीच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहीत मोहोळकर, माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केले आहे. या वेळी संचालक आमदार यशवंत (तात्या) माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, मनोहर ढुके, संदीप पाटील, रुपाली संतोष वाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे व प्र. सचिव संतोष देवकर उपस्थित होते.