पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे हा टोलनाका नियमबाह्य असल्याने तो तातडीने बंद करावा, अशी मागणी अनेक दिवसापासूनची आहे.
या मागणीसाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलने झाली होती.मागणी करुनही टोलनाका बंद करत नसल्याने अखेर त्यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
नियमबाह्य असलेल्या सोमाटणे टोलनाक्याबातची सुनावणी जलदगतीने होणार असल्याने लवकरच हा प्रश्न सुटणार असल्याचे दिसते. मावळवाशीयांच्या दृष्टीने हे प्रकरण महत्वाचे असल्याने याची सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी किशोर आवारे यांनी केली होती.
यानुसारच्या जलदगती सुनावणीसाठी न्यायालयाने तीन लाख रुपये अनामत रक्कम भरण्याचे याचिका कर्त्यांना सुनावले होते. यानुसार याचिकाकर्त्यांच्या वतीने लोकवर्गणीतून रक्कम जमा करुन ती न्य़ायालयाला अदा केल्याने आता जलदगती न्यायालयाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
येत्या चौदा तारखेला सुनावणी होणार असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार, अशी अपेक्षा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी व्यक्त केली. नियमानुसार दोन टोल नाक्यातील अंतर साठ किलोमीटरपेक्षा कमी ठेवता येत नाही. हा नियम येथे न पाळल्याने एकाच रस्त्यावर एकाच तालुक्यात दोन टोलनाक्यावरच्या टोलचा भुर्दंड स्थानिकांना आजपर्यंत सहन करावा लागत आला.न्यायालयाच्या निकालानंतर ही समस्या सुटण्याची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे.