Solapur News : सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. श्रवण वय 15 आणि श्रावणी वय 10 अशी मृत मुलांची नावे असून, या घटनेमुळे एका कुटुंबाचा आधारच हरपला आहे.

काही वर्षांपूर्वी वडिलांचे अपघातात निधन झाल्यानंतर आई उषा अंकलगी या आपल्या दोन मुलांसह कारकल येथे राहत होत्या. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने श्रवण आपल्या बहिणीसोबत वेळ घालवण्यासाठी घरी आला होता. दुपारच्या सुमारास दोघेही शेतातील शेततळ्याकडे गेले. पोहण्याची इच्छा आणि खेळण्याचा उत्साह यामुळे त्यांनी पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला.
सुरक्षिततेसाठी त्यांनी एक दोरी झाडाला बांधली आणि दुसरे टोक स्वतःच्या कमरेला बांधले होते. मात्र काही वेळातच झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि दोघांचा आधार तुटला. पाण्याची खोली जास्त असल्याने दोघेही बाहेर येऊ शकले नाहीत आणि काही वेळातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.
बराच वेळ झाला तरी मुलांचा आवाज न आल्याने आजीला संशय आला. त्यांनी शेततळ्याकडे जाऊन पाहिले असता दोन्ही मुले पाण्यात निश्चल अवस्थेत दिसून आली. आजीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आसपासचे शेतकरी तातडीने मदतीला धावले. त्यांनी मुलांना बाहेर काढून मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







