पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत विविध साधने खरेदी करण्यासाठी निधी वितरण करण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी ऑफलाइन अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी सहाय्यभूत आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी या योजनेंतर्गत लाभ दिले जातात. आधार संलग्न बँकेच्या बचत खात्यात एक वेळ ऑनलाइन पद्धतीने करण्याऐवजी निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाद्वारे एक वेळ एकरकमी तीन हजार रुपयांच्या मर्यादेत ऑफलाइन पद्धतीने वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.