केडगाव / गणेश सुळ : दौंड तालुक्यात सर्वच जाती धर्माचे लोक सण, उत्सव येथील सर्वधर्मीय बांधव एकत्र येत साजरे करतात, अशी दौंड तालुक्याची परंपरा आहे. याच परंपरेनुसार, नुकतेच गणेशोत्सव साजरा झाला असताना आज प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती सुद्धा सर्वधर्मीय बांधवांनी एकत्र येत मोठ्या जल्लोषात साजरी केली. पैगंबर जयंतीनिमित्ताने विविध मंडळांनी सामाजिक उपक्रम राबविले. येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने शाही आलमगीर मशिदीचे मौलाना अस्लम रझा यांच्या नेतृत्वाने जुलूसचे (मिरवणूक) आयोजन करण्यात आले.
सालाबादप्रमाणे, दुपारी 3 वाजता आलमगीर मशीद येथून जुलूसला सुरुवात करण्यात आली. पारंपारिक वेशभूषा परिधान करत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जुलूसमध्ये सहभागी झाले होते. उंट, घोड्यांवर स्वार होत बच्चे कंपनीने जुलूसमध्ये सामील होण्याचा आनंद घेतला. शहरातील प्रमुख चौकांमध्ये विविध मंडळांकडून जुलूसचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांना मिठाई, आईस्क्रीम, सरबत वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने व शिवस्मारक समितीच्या वतीने जुलूसचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी मौलानांचा व मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. मराठा महासंघाच्या वतीने आईस्क्रीमचे वाटपही करण्यात आले होते.
आमदार राहुल कुल, मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे, योगेश कटारिया तसेच मा. आमदार रमेश थोरात यांचे प्रतिनिधी तुषार थोरात, शहरातील सर्वच पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राहुल कुल व प्रेमसुख कटारिया यांनी आलमगीर मशिदीचे मौलाना अस्लम रझा यांचा शाल, पुष्पगुच्छ देत सत्कार केला. आलमगीर मशीद येथे फटाक्यांच्या आतिषबाजीत जुलूसची सांगता करण्यात आली.