हनुमंत चिकणे
लोणी काळभोर (पुणे) : कै. अण्णासाहेब मगर उपबाजार समितीमध्ये खोतीदार शेतकऱ्यांना समितीच्या संचालकांनी मज्जाव केल्याने खोतीदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचालक मंडळाच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी बाळासाहेब भिसे यांनी हडपसर परिसरात ‘भिक मागो’ आंदोलन केले. या निर्णयाचा संचालक मंडळाने फेरविचार करून खोतीदारांना परवानगी न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा खोतीदार बाळासाहेब भिसे यांनी दिला आहे.
हडपसर भाजीपाला मार्केट येथील जागेची मर्यादा लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीने शेवाळवाडी येथे उपबाजार स्थलांतरित केला आहे. तेरा वर्षांपूर्वी (कै.) अण्णासाहेब मगर उपबाजार नावाने सुरू झालेल्या या मार्केटमध्ये खोतीदार सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा माल बांधावर खरेदी करून या उपबाजारात विक्रीसाठी आणत होते. बाजार समितीच्या वतीने या खोतीदारांकडून सर्व प्रकारचा महसूल घेतला जात होता.
संचालक मंडळाच्या भ्रष्टाचारामुळे बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला होता. तब्बल २० वर्षे प्रशासक राज होते. तोपर्यंत या उपबाजारात खोतीदार माल विकत होते. परंतु संचालक मंडळ नियुक्त झाल्यावर व्यापार करण्यास मज्जाव केला. शेतकरीच माल विकणार हे कारण दाखवून त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली. प्रत्यक्षात संचालकांच्या जवळचे कार्यकर्ते दुबार विक्री करताना मार्केटमध्ये दिसत आहेत, असा आक्षेप घेतला जात आहे. संचालकांच्या या मनमानी कारभारामुळे खोतीदार व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेले तीन महिने व्यवसाय बंद, मुलांचे शिक्षण, हप्ते, घर भाडे भागवायचे कसे त्यातून या वयात कुठे कामाला जायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने हडपसर भाजीपाला मार्केटमध्ये ‘भिक मागो’ आंदोलन करण्यास सुरुवात केल्याचे बाळासाहेब भिसे यांनी सांगितले या अनोख्या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधले.
… तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही!
शेतकऱ्यांसाठी उपबाजार आहे, येथे खोतीदारांना प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगून नियमावली मांडत असताना इतकी वर्षे खोतीदार व्यवसाय करत होते, त्यांच्याकडून महसूल गोळा केला तो नियमबाह्य होता का? माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मला भीक मागण्याशिवाय पर्याय नाही. भिक मागून माझ्या कुटुंबाचा चरीतार्थ नाही चालला व मला जर न्याय मिळाला नाही तर मला आत्महत्या करावी लागेल, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही.
– बाळासाहेब भिसे, खोतीदार
… हा तर भिसे यांचा स्टंट
मांजरी येथील मार्केट हे शेतकरी ते ग्राहक यांच्यासाठी आहे. येथे खोतीदार याआधी व्यवसाय करत होते. परंतु प्रशासकांना नियम माहित नसल्याने ते चालत होते. खोतीदारांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यासाठी कोरेगाव मूळ येथे वेगळे मार्केट आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. बाळासाहेब भिसे आंदोलन करून स्टंट करत आहेत. संचालक मंडळाने ठराव केल्याने खोतीदारांना व्यवसाय करण्यास प्रवेश दिला जाणार नाही.
– दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हवेली